पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अजरापत्रित गट – ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर पुणे जिल्ह्यातीलच मयुरी सावंत यांनी महिला वर्गवारातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे ६ जुलै आणि १७ जुलै २०२२ रोजी ही परीक्षा घेतली होती. निकालासह प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुणही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जाहीर केलेला निकाल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.
हेही वाचा – केरळमध्ये आनंद सरींचा वर्षाव, मोसमी पाऊस दाखल
हेही वाचा – देशात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट, तूर्त आयातीची शक्यता कमी
दरम्यान प्राविण्यप्राप्त खेळाडूचा दावा केलेल्या शिफारसपात्र काही उमेदवारांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पात्र खेळाडू उमेदवारांची क्रीडा प्रमाणपत्र अहवालाची पुनर्पडताळणी करण्याच्या अटीच्या अधीन राहून खेळाडू उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. उर्वरित ३५८ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. खेळाडू उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.