कलाकार मोठा असो किंवा नवखा, सर्वांबरोबर तितक्याच तन्मयतेने वादन करणारे… वादनामध्ये माधुर्य आणि सलगता जपणारे… मैफिलीमध्ये रंग भरण्याचे कसब साध्य केलेले… वादन करताना भात्याचा सुरेख वापर करून स्वरांवर जोर देण्याची किमया साधणारे… अप्पा आणि संवादिनी यांचे सुरेल असे अतूट नाते होते, अशा शब्दांत ज्येष्ठ संवादिनीवादक पं. अप्पा जळगावकर यांच्या वादनाची वैशिष्ट्ये संवादिनीवादकांनी उलगडली.
सुधीर नायक म्हणाले, ‘संगतकार म्हणून अप्पा श्रेष्ठ होते. कोणाही कलाकाराबरोबर समरस होण्याची कला त्यांनी साध्य केली होती. दिग्गज कलाकाराबरोबरच नवख्या कलाकारालाही संवादिनी साथ करताना ते समरस होत असत. त्यांच्या हातामध्ये वादनासाठीचा सलगपणा होता. त्यांची लयीची बाजू भक्कम होती. त्यामुळे तबलावादकांसमवेत ते नगमा वादन करायचे. वादनासाठी भात्याचा वापर ते सुंदर करायचे. एखाद्या स्वरावर जोर देऊन प्रकाश टाकण्याचे काम ते लीलया करायचे. सर्वांबरोबर मिसळून जाण्याचा त्यांचा स्वभाव वाखाणण्याजोगा होता. प्रत्येक कलाकार आपल्या वाद्यावर प्रेम करत असतो, पण एकदा ग्रीन रुममध्ये अप्पांनी त्यांची संवादिनी वाजविण्याची संधी मला दिली होती.’
चैतन्य कुंटे म्हणाले, ‘सुरांचा अतूट असा भरणा अप्पांच्या वादनामध्ये असायचा. सलगपणा हाच त्यांच्या वादनातील गुण मानता येईल. नजाकत म्हणजे लालित्यपूर्णता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग होता. प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे स्वरमंचावरील आगमनापासूनच त्यांना श्रोत्यांची दाद मिळायची. गायकाची कलेची करामत श्रोत्यापर्यंत पोहोचविण्याचे अप्पा हे दुवा होते. कलाकार छोटा असो किंवा मोठा, अशा अवकाशामध्ये कलाकाराला सांभाळून घेऊन मैफिलीचे वातावरण प्रसन्न राहील, असे त्यांचे वादन असायचे.’
सुयोग कुंडलकर म्हणाले, ‘गुरूनंतर ज्यांना मी मनापासून मानतो असे अप्पा आहेत. लहानपणापासून माझ्यावर अप्पांचे संस्कार असल्याने मी त्यांची नक्कल करायचो. कुठेही गोंगाट न होऊ देता मैफिलीमध्ये मिसळून जाणे हे त्यांचे मोठे योगदान आहे, असे वाटते. एका मिनिटामध्ये रंग कसा भरायचे हे अप्पांकडे बघून मी शिकलो. हे त्यांचे ऋण मी शेवटपर्यंत मानेन.’
स्मृती जागविताना…
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी अमोणकर, संगीत मार्तंड पं. जसराज, पं. कुमार गंधर्व अशा दिग्गज कलाकारांपासून ते नवोदित कलाकारांच्या मैफिलीमध्येही आपल्या संवादिनीवादनाने रंग भरणारे पं. अप्पा जळगावकर यांचे जन्मशताब्दी वर्ष रविवारपासून (४ एप्रिल) सुरू होत आहे. हे औचित्य साधून सुधीर नायक, डॉ. चैतन्य कुंटे आणि सुयोग कुंडलकर यांनी अप्पांच्या आठवणी जागविताना त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये सांगितली.