पिंपरी : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा ‘स्वररंजन’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रम श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे यांच्या हस्ते पं. संजीव अभ्यंकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
‘तुज नमन असो प्रथमेशा’ या पं. संजीव अभ्यंकर यांनी गेलेल्या श्रीगणेश वंदनेने ‘स्वरसंजीवन’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘ऐसे पंढरीचे स्थान; याहूनी आणिक आहे कोण’, ‘माझे चित्त तुझे पायी’, ‘बोलावा विठ्ठल; पाहावा विठ्ठल’, ‘श्री गुरुसारिखा असता पाठीराखा’, ‘ध्यान लागले रामाचे’ या एकाहून एक अवीट भक्तीगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. ‘येथे का रे उभा श्रीरामा; मनमोहन मेघश्यामा’ या श्रीरामाच्या रचनेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे ही वाचा… लघुउद्योजकांसाठी खुशखबर! सरकारच्या वतीने कामगिरीचा होणार गौरव; योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या…
यावेळी कोरसमध्ये साईप्रसाद पांचाळ, धनंजय म्हसकर, मुक्ता जोशी, अबोली देशपांडे यांनी अभ्यंकर यांची साथसंगत केली. तर तबल्याची साथ अजिंक्य जोशी, हार्मोनियमची साथ अभिनय रवंदे, प्रथमेश तारळकर यांनी पखवाज साथ तर टाळ वाद्याची साथ अपूर्व द्रविड यांनी केली. या कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी जोशी यांनी केले.