महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुलंचे हस्ताक्षर आता डिजिटल फॉन्टमध्ये पाहावयास मिळणार आहे. समाजमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘बी बिरबल’ संस्थेच्या गंधार संगोराम यांनी निर्मिती केलेल्या या डिजिटल फॉन्टचे पुलंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (१२ जून) अनावरण करण्यात येणार आहे.
पुलंच्या हस्ताक्षराचे डिजिटल प्रतीक ‘पुल १००’ (PuLa100) या नावाने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे त्यांच्या अक्षरलेखनातील मौज रसिकांना डिजिटल फॉन्टमध्येही अनुभवता येणार आहे.
गंधार संगोराम म्हणाले,‘पुलंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना या महान साहित्यिकाच्या हस्ताक्षराचा फॉन्ट बनवून त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या फॉन्टचे नावदेखील ‘पुल १००’ असे देण्यात आले आहे. दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही कल्पना प्रत्यक्षात साकारलेली पाहून समाधान वाटत आहे.’
पुलंचे चाहते जगभरात आहेत. एवढय़ा लोकप्रिय व्यक्तीच्या हस्ताक्षराचा फॉन्ट बनविणे ही अत्यंत जोखमीची जबाबदारी होती. त्यांच्या लेखनातील मर्म फॉन्टमध्ये उतरविणे हे सर्वात मोठे आव्हान होते. ही प्रक्रिया प्रथम घरगुती प्रयोगात्मक स्वरूपात सुरू झाली. त्यासाठी ‘आयुका’ संस्थेमधून पुलंच्या अक्षरांचे काही नमुने मिळवण्यात आले. त्यानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एका फॉन्टतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले.
डॉ. दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, ‘आयुका’चे निरंजन अभ्यंकर आणि फॉन्टतज्ज्ञ किमया गांधी यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. http://www.bebirbal.in/pula100 या संकेतस्थळावरून हा फॉन्ट विनामूल्य डाऊनलोड करता येईल, असेही गंधार संगोराम यांनी सांगितले.
पुलंच्या हस्ताक्षराला त्यांच्या विचारांची गती आणि त्याच्या प्रत्येक वक्राकाराला एक प्रवाह आहे. त्यांच्या मनातील हा प्रवाह हस्ताक्षरातून दृश्य स्वरूपात येतो. अशा एका महान व्यक्तिमत्त्वाच्या हस्ताक्षराला प्रत्यक्षात उतरवत त्याला मूर्त स्वरूप देत डिजिटल रूपात चिरकाळासाठी अमर करणे ही मोठी उपलब्धी आहे, असे गंधार संगोराम यांनी सांगितले.