पुणे : पुण्यात मोठ्या संख्येने परप्रांतीय विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते स्थायिक झाले आहेत. शहरात ‘पब कल्चर’ फोफावले आहे, अशी टीका केली जाते. शहराचे रूपांतर महानगरात झाले आहे. महानगरातील ‘पब कल्चर’, सांगीतिक कार्यक्रमांना विरोध नाही. मात्र, पबचालक, तसेच सांगीतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी नियमांच्या अधीन राहून व्यवसाय केला पाहिजे. सामान्यांना त्याचा त्रास होता कामा नये, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.

पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले काॅलनी मंडळाकडून ‘काॅफी विथ सीपी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी दिलीप टिकले यांनी संवाद साधला. यावेळी पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशनच्या मनीषा धारणे, विनायक धारणे उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यात ‘एसटी’ची सर्वाधिक भ्रमंती कोठे ? कोणी केली सर्वाधिक कमाई ?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुण्यात परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. महानगरात अनेक सोयी सुविधा निर्माण होतात. पब हा प्रकार किंवा व्यवसाय त्यापैकी एक आहे. पबमुळे संस्कृतीला धक्का पोहोचतो. गैरप्रकार होतात, अशी टीका करण्यात आली. पबमुळे पुणेकरांच्या अस्मितेला अजिबात धक्का पोहोचणार नाही. कारण मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर आहेत. पबला विरोध नाही. मात्र, पबच्या नावाखाली सुरू गैरप्रकारांना पोलिसांचा विरोध आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील आवाजामुळे सामान्यांना त्रास होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पबचालकांसाठी नियमावली ठरवण्यात आली. पब चालक, सांगीतिक कार्यक्रम किंवा जाहीर ठिकाणी ध्वनिवर्धक, लेझर झोत वापरणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उत्सवाच्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या ध्वनिवर्धकांबाबत पुणेकरांनी जागरुक होऊन विरोध करायला हवा.’

हेही वाचा – पिंपरी : अवैध बांगलादेशींविरुद्ध पोलिसांचा बडगा; ‘वाचा’ आतापर्यंत किती जणांवर केली कारवाई?

मेट्रोच्या कामासाठी २८ फेब्रुवारी अंतिम मुदत

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम गणेशखिंड रस्त्यावर सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक विस्कळित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी पोलिसांनी वेळोवेळी संवाद साधला आहे. पुढील वर्षी २८ फेब्रुवारीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण करावे. गणेशखिंड रस्त्यावर लावलेले लोखंडी कठडे (बॅरीकेट्स) काढून टाकावेत, तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून सुस्थितीत करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मेट्रोने स्थानके उभारण्यासह अन्य तांत्रिक कामे करावीत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

Story img Loader