स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे निदान लवकर होणे आवश्यक असते. प्रत्येक स्त्रीला मॅमोग्राफीसारखी तपासणी करून घेणे शक्य नसल्यामुळे त्यांना घरच्या घरी स्वत: चाचणी कशी करता येईल, याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे (आयएमए) प्रशिक्षण शिबिरे घेतली जाणार आहेत.
२०१३- १४ साठीच्या आयएमए पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. यासंबंधी माहिती देताना संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे बोलत होत्या. संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश मराठे या वेळी उपस्थित होते. स्तनांच्या कर्करोगाविषयीची ही जनजागृती शिबिरे पुढील पाच वर्षे ठिकठिकाणी घेतली जाणार आहेत. संस्थेच्या पुणे शाखेच्या उपाध्यक्षपदी डॉ. अरूण हळबे आणि डॉ. गणेश दातार यांची, खजिनदारपदी डॉ. मोहन जोशी यांची आणि सचिवपदी डॉ. प्रकाश मराठे आणि डॉ. पद्मजा अय्यर यांची निवड करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आयएमएच्या डॉ. संचेती सभागृहात पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. या वेळी संस्थेतर्फे डॉ. एम. टी. आळेकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, डॉ. विजय कर्णिक यांना ‘वैद्यकीय समाज सेवा पुरस्कार’ तर डॉ. रमेश मूर्ती यांना ‘युवा वैद्यक निपुण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.