पिंपरी चिंचवड शहरात गोवंशीय प्राण्यांची संख्या ३ हजार पाचशे असून आतापर्यंत ५ लम्पी विषाणू बाधित जनावरे आढळून आली आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.लम्पी विषाणू साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. या वेळी लम्पीसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. उपायुक्त सचिन ढोले, अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>खडकी रेल्वे स्थानकाचा टर्मिनल म्हणून विकास करावा – खासदार गिरीश बापट यांची सूचना

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की लम्पी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गाेवंशीय जनावरांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. या विषाणूबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शहरातील गोशाळा, पांजरपोळ, गोठे याठिकाणी पशुवैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करावीत, असे आदेशही आयुक्तांनी बैठकीत दिले.लम्पी विषाणूंबाबत चुकीची माहिती प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त सचिन ढोले यांनी दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public awareness campaign of pimpri chinchwad municipal corporation to prevent outbreak of lumpy virus pune print news amy