केवळ कायदे आणि नियम करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. चित्रकला, कविता, लेख या विविध माध्यमातून अभिव्यक्त होत पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती गरजेची आहे, असे मत पर्यावरणमंत्री संजय देवताळे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि सेंटर फॉर एनव्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात संजय देवताळे यांच्या हस्ते पर्यावरण प्रकल्प, पर्यावरणावर आधारित कविता, कथा, चित्रमालिका आणि स्लाईड शो अशा विविध गटांतील विजेत्यांना सृष्टी मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण सचिव वल्सा नायर, ‘सीईई’च्या संस्कृती मेनन या प्रसंगी उपस्थित होत्या.
संजय देवताळे म्हणाले,‘‘ चित्र आणि कला या माध्यमातून नव्या पिढीमध्ये पर्यावरण संरक्षणासंदर्भात रुची निर्माण होऊ शकेल. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी कथा, कविता, लेख, चित्रकला आणि छायाचित्रकला या माध्यमातून अभिव्यक्त झाले पाहिजे. हवा आणि ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर अशा पद्धतीनेच जनजागृती करता येणे शक्य होईल. विकास होतो तेथे प्रदूषणाची समस्या उद्भवते. त्यामुळे स्वत:वर बंधने घालून घेतल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. गणपती, होळी, दिवाळी हे सण पर्यावरणपूरक साजरे करण्यासंदर्भात जागृती होत आहे. पुणे, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक सण साजरे करण्याविषयी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रासायनिक रंगांविषयीचे धोके ध्यानात आले असल्याने आता नैसर्गिक रंगांची मागणी वाढत आहे. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत कमी होत असून पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवले तर शाश्वत विकास करता येईल.’’
वल्सा नायर म्हणाल्या,की केंद्र सरकारने सुचविल्याप्रमाणे राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत शाळांमध्ये इको क्लब स्थापन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सध्या ७ हजार ७९८ इको क्लब स्थापन करण्यात आले आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा