शहरात सोनसाखळी चोरटय़ांनी पुन्हा उच्छाद मांडला असून दिवसभरात विविध ठिकाणी पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. कोथरूड येथील घटनेत सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरटय़ाला नागरिकांनी पकडून चोप दिला. या प्रकरणी हिंजवडी, सहकारनगर, चिंचवड आणि कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
योगेश ज्ञानेश्वर निकम (वय ३६, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मिथुल दिगंबर चोथे (वय २४, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुल या सकाळी पावणे नऊच्या सुमारास घराजवळ भाजी आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सोसायटीच्या आवारात पाठीमागून आलेला निकम हा त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळू लागला. मिथुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. मिथुल यांनी गळ्यात घातलेली साखळी सोन्याची नसून बॅन्टेक्सची होती. दुसऱ्या घटनेत कोथरूड येथील गणंजय सोसायटीमध्ये शालिनी शंकर साबडे (वय ७०, रा. गांधीभवन जवळ, कोथरूड) या रस्त्याने जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा गोफ हिसकावून नेला.
बावधन येथील सृष्टी विहार येथे मयूर मधुकर पवार (वय २४, रा. सेनापती बापट रस्ता) हे मोटारसायकलवरून जात असताना गाडी नीट चालवता येत नाही अशी दमदाटी करून त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून नेली. अरणेश्वर येथील स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये राहणाऱ्या वसुंधरा रमेश देशपाडे या सकाळी घरासमोरून जात असताना त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. चिंचवड येथील श्रीधरनगर येथे स्मिता सुधीर जोशी (वय ५३) या घरासमोरून रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची २५ हजाराची सोन्याची साखळी चोरून नेली.