पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवालने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पवयीन मुलाने पबमध्ये मित्रांबरोबर पार्टीसाठी नोंदणी (बुकिंग) केली होती. त्या पबचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी मुलांच्या वयाबाबत शहानिशा न करता त्यांना मद्य विक्री केली. याप्रकरणात आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते पुराव्यात छेडछाड करतील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. सरकार पक्षाकडून आरोपींच्या जामिनास विरोध करण्यात आला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), तसेच अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ पबच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ‘ब्लॅक’ पबचा सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा), व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
हेही वाचा >>> पुणे : कोंढव्यातील दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
बचाव पक्षाचे वकील ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे, ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात आरोपींनी पोलिसांना सहकार्य केले असून, आरोपींविरुद्ध दाखल केलेला गुन्हा जामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.
हेही वाचा >>> Pune Accident Case : विशाल अगरवालचा पाय खोलात! आणखी एक गुन्हा दाखल
विशेष सरकारी वकील विद्या विभुते आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी बचाव पक्षाच्या युक्तिवादास विरोध केला. कल्याणीनगर भागात अपघात झाल्यानंतर विशाल अगरवाल पसार झाला होता. त्याने वडगाव शेरीतील बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणात तांत्रिक छेडछाड केली. माेटारचालक गंगाधर हेरीक्रुब याला मुलाने केलेला गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव आणला, तसेच मोटारचालकाला बंगल्यात डांबून ठेवले. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी पबमध्ये पार्टी केली. त्यांच्या वयाबाबत शहानिशा न करता त्यांना मद्य विक्री करण्यात आली. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते पुराव्यात छेडछाड करतील, असा युक्तिवाद सरकारी वकील विभुते यांनी केला. ‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्रीस मनाई असल्याचा फलक लावला नव्हता. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात ही बाब उघडकीस आली असून, पबमालक, कर्मचाऱ्यांचा जामीन फेटाळण्यात यावा, असे विभुते यांनी युक्तिवादात नमूद केले. बचाव आणि सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादानंतर जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय दिला नाही. जामीन अर्जावर २१ जून रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.