पक्षाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क कार्यालयांची गरज असते. मात्र, या कार्यालयांच्या माध्यमातून गरजवंतांची कामे झाली पाहिजेत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले; त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल शेवाळे, पालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती बाबा धुमाळ, नगरसेविका सुवर्णा पायगुडे तसेच भाऊसाहेब कऱ्हे, विकास दांगट आदी त्या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले,‘‘पक्षात काम करताना मोठा उत्साह असतो, पण लोकांच्या संपर्कासाठी केंद्र उभारण्याची गरज असते. त्या माध्यमातून पक्षाला लोकांपर्यंत पोहोचायचे असते. जनसंपर्क कार्यालय छोटेच असणे गरजेचे असते. मोठय़ा कार्यालयात अनावश्यक लोकच बसलेले असतात. हे अनावश्यक लोक कार्यालयात नकोत. कामापेक्षा व गरजेपेक्षा जास्त माणसे कार्यालयात येऊ नयेत, अशी व्यवस्था असली पाहिजे. ज्यांचे खरेच काम आहे, अशा लोकांना कार्यालयात येता आले पाहिजे व त्या माध्यमातून खऱ्या गरजवंतांची कामे या कार्यालयाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे.’’