वेगळ्या वाटेने जाणाऱ्या आशयघन चित्रपटांची निर्मिती होत असून या नव्या चळवळीला प्रेक्षकांचे पाठबळ मिळायला हवे, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण राव यांनी शनिवारी व्यक्त केली.
‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’तर्फे (एफटीआयआय) घेण्यात आलेल्या चित्रपट रसग्रहण वर्गाचा समारोप किरण राव यांच्या उपस्थितीत झाला. ‘एफटीआयआय’चे संचालक डी. जे. नारायण, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे आणि चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक पी. के. नायर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
केवळ रंजनासाठी असे स्वरूप न राहता वेगळ्या वाटेने जाणाऱ्या आशयसंपन्न चित्रपटांची निर्मिती होत आहे. या चित्रपटांची एक नवी चळवळ कार्यरत आहे. मात्र, अशा चित्रपटांच्या प्रचारासाठीचे नेटवर्क नाही. त्याचप्रमाणे या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभत नाही. ‘आम्हाला हवे तेच चित्रपट पाहणार’, अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली तर, कला माध्यमात काम करणाऱ्यांवर चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी दबाव येऊ शकेल आणि या चित्रपटांना प्रेक्षकांच्या ‘सपोर्ट ग्रुप’चे प्रोत्साहन मिळेल, असे किरण राव यांनी सांगितले.
पत्रकारिता अभ्यासक्रम करताना चित्रपट रसग्रहण विषयांतर्गत ‘बॅटलशिप पोटेमकिन’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने माझे आयुष्य बदलले. एवढेच नव्हे तर, चित्रपटाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सजग झाला आणि चित्रपट या विषयामध्ये मी गुंतले, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा