आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये अस्थिर सरकार आले, तर या देशातील बहुभाषक समाजरचना आणि लोकशाहीसाठी ती चिंताजनक बाब ठरेल. या गोष्टीचा विचार करून देशातील नागरिक अधिक मजबूत सरकारलाच कौल देतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केला.
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पी.आय.सी.) ‘रिइन्वेंटिंग इंडिया : परस्पेक्टिव्ह ऑफ स्टेट्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार विजय केळकर, ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक दिलीप पाडगावकर आणि यशदाचे महासंचालक डॉ. संजय चहांदे या प्रसंगी उपस्थित होते.
जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता, रुपयाची घसरण, ऊर्जासुरक्षा, दहशतवाद अशी विविध आव्हाने उभी ठाकली असून देश एका संक्रमणावस्थेतून जात आहे. अशा काळात प्रादेशिक अस्मिता, छोटय़ा घटकसमूहांच्या अस्मिता या माध्यमातून विभाजनवादी प्रवृत्ती देखील डोके वर काढत आहेत. अनेकदा निवडणुकांपूर्वीच अशा प्रवृत्ती बळावतात असा यापूर्वीचाही अनुभव आहे. या परिस्थितीमध्ये निवडणुकीनंतर देशाला स्थिर सरकार मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. यापूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकीतही अशी स्थिती उद्भवली होती. आता २०१४ मधील निवडणूक देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. निवडणुकीनंतर केंद्रात अस्थिर सरकार सत्तेवर आले, तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यातूनही परिस्थिती बदलण्याची खात्री देता नाही. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार कमजोर ठरेल आणि वेगवेगळ्या छोटय़ा शक्ती आपले परस्परविरोधी हितसंबंध जोपासण्यासाठी सरकारवर दबाव आणतील, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. निवडणूकपूर्व निकालांचे सर्वेक्षण सुरू असून त्यांचे वेगवेगळे निष्कर्ष समोर येत आहेत. परंतु त्यावर आपला विश्वास नाही. सर्व परिस्थितीचा विचार करून देशातील जनता स्थिर आणि मजबूत सरकारलाच कौल देईल, असेही त्यांनी सांगितले.
पावसाच्या पाण्याचा सुयोग्य वापर करून शाश्वत शेती, जलस्रोतांच्या व्यवस्थापनातून दुष्काळापासून मुक्ती, एकात्मिक औद्योगिक धोरण, नियोजनबद्ध नागरीकरण आणि शिक्षणामध्ये गुणवत्तावाढीला प्राधान्य हे महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठीचे पाच अग्रक्रम आपल्यासमोर असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. या दृष्टीने आपण पावलेही टाकली असून त्याचे फळ लवकरच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ नैसर्गिक साधनांच्या आधारे नव्हे तर, ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेतूनच देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी माशेलकर आणि पाडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. केळकर यांनी आभार मानले.
देशातील नागरिक मजबूत सरकारलाच कौल देतील
या देशातील बहुभाषक समाजरचना आणि लोकशाहीसाठी ती चिंताजनक बाब ठरेल. या गोष्टीचा विचार करून देशातील नागरिक अधिक मजबूत सरकारलाच कौल देतील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
First published on: 26-08-2013 at 02:40 IST
TOPICSपब्लिक
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public will vote for strong govt cm