मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाक्युध्दात अजितदादांचे निकटवर्तीय मंत्री सुनील तटकरे यांनीही उडी घेतली आहे. अजितदादांचे नेतृत्वगुण व त्यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतानाच, सभांना किती माणसे जमतात, यापेक्षा कोण किती कामे करतो, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे, अशी टिपणी तटकरी यांनी ठाकरे यांना उद्देशून केली.
पिंपरी महापालिका व विसिलेक्स फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्हीजन २०२०’ या कार्यक्रमासाठी पिंपरीत आलेले तटकरे पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी भाषणात काय बोलावे, कसे बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व मोठे होते, तसे राज यांचे नाही. व्यक्तिगत टीका करण्याची राळ सध्या राज्यात उठली आहे. मात्र तसे करण्याने काहीही साध्य होत नाही. लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, त्यांच्या दु:खात समरस झाले पाहिजे. केवळ बोलून काही उपयोग होत नाही. नागरिकांची कामे केली पाहिजेत. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. त्यांना कामातून उत्तर देऊ. गुजरातच्या विकासाची महाराष्ट्राशी तुलना करण्याचा मोह ठाकरे यांना आवरत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.   
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते काम करत असून राष्ट्रवादीची सर्वसामान्य नागरिकांशी बांधिलकी आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे व पिंपरी-चिंचवडचा भरीव विकास होतो आहे. दोन्ही शहराला मिळणाऱ्या पाण्यावरून होणारी टीका चुकीची आहे. बंद नळयोजना हा चांगला निर्णय आहे. व्यवहार व विकासाची दृष्टी यांची सांगड घातली गेली पाहिजे. सुनियोजित शहरे झाली पाहिजेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असला पाहिजे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा