पुणे : ‘औद्योगिक क्षेत्रे, विमानतळ, बंदरे आणि पर्यटनस्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत,’ अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

शिवेंंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड, दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

भोसले म्हणाले, ‘राज्यात औद्योगिक आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी राज्य सरकार खूप प्रयत्नशील आहे. राज्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून नवीन रस्ते प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार रस्ते, इमारतींच्या कामांचे लक्ष्य गाठतानाच त्यांची गुणवत्ता, अधिकार क्षेत्रातील इमारतींची स्वच्छता, व्यवसायस्नेही वातावरणनिर्मिती आदींवर लक्ष द्यावे.’

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत टप्प्याटप्प्याने काम हाती घ्यावयाचे आहे, या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करायची असून, पर्यटक अधिक काळ तेथे थांबतील, या दृष्टीने पायाभूत सुविधा आणि आकर्षणकेंद्रे निर्माण कशी करता येतील, याबाबत अभ्यास करावा. पर्यटन हा रोजगार देणारा उद्योग असून, राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यासाठी महत्त्वाची पर्यटनस्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असून, त्या दृष्टीने नियोजन करावे,’ असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती विभागाला कळविण्यासाठी ‘पॉटहोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस)’ हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून, संकेतस्थळावर, अँड्रॉईड प्ले-स्टोअर तसेच भारत सरकारच्या एमसेवा पोर्टलवरदेखील ते उपलब्ध करण्यात आल्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले.