‘माझे नृत्य मला घराघरांत पोहोचवायचे आहे. जगभरातील कुणालाही कोणत्याही प्रकारचे नृत्य शिकायचे असेल, तर ते एका छताखाली शिकता यावे यासाठी मी डान्स अॅकॅडमी सुरू केली’ असे माधुरी दीक्षित हिने गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दाजीकाका गाडगीळ यांच्यावरील पुस्तकांचे प्रकाशन माधुरीच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
दाजीकाका गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ उपस्थित होते. छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडणारा दाजीकाकांचा प्रवास, त्यांचे जीवनचरित्र आणि त्यांच्याबद्दल इतरांनी केलेले लिखाण अशा स्वरूपात तीन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. या वेळी माधुरीने उपस्थितांशी संवाद साधला.
या वेळी माधुरी म्हणाली, ‘नृत्य हे माझे स्वप्न आहे. नृत्याच्या माध्यमातून मला घराघरांत पोहोचायचे आहे. जगभरात नृत्याचा प्रसार करायचा आहे. कोणताही नृत्यप्रकार एकाच छताखाली शिकता यावा, यासाठी ‘डान्स विथ माधुरी डॉट कॉम’ ही ऑनलाइन नृत्य अॅकॅडमी सुरू केली आहे.’ सिनेसृष्टीतील एक मोठा कालखंड गाजवणारी अभिनेत्री ते आता दोन मुलांची आई यापैकी कोणती भूमिका आवडते, याबाबत माधुरी म्हणाली, ‘मला सगळय़ाच भूमिका आवडल्या. लग्नानंतर जबाबदारी आली, मात्र तीही मला आवडली. आता दोन मुलांची आई म्हणूनही मी एन्जॉय करते. माझी मुले आता मोठी झाली आहेत, त्यामुळे मी पुन्हा एकदा माझ्या आवडींकडे वळले आहे. मराठी चित्रपटांबद्दल मला विचारले जाते, मात्र चांगली संधी मिळाली तर मराठी चित्रपट करायला आवडेल.
पाश्चात्त्य किंवा भारतीय शैलीच्या दागिन्यांमध्ये भारतीय शैलीचे दागिनेच आवडत असल्याचे माधुरीने सांगितले. ती म्हणाली, ‘पाश्चात्त्य शैलीचे दागिने हे साधे आणि सुटसुटीत असतात, मात्र भारतीय शैलीच्या पारंपरिक दागिन्यांवरील काम, कलाकुसर ही अधिक आवडते.’ या वेळी पीएनजी ज्वेलर्सच्या मंगळसूत्र महोत्सवातील भाग्यवान विजेत्यांना माधुरीच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Story img Loader