दोन लेखकांनी संयुक्तपणे लिहिलेल्या ‘लिटरली युवर्स’ या इंग्रजी प्रेमकथेचे प्रकाशन नुकतेच पुण्यामध्ये झाले. लेखक चेतन जोशी हे पुण्याचे, तर लेखिका आशा फ्रान्सिस या बंगळुरूच्या आहेत. भौगोलिकदृष्टय़ा दोन शहरांतील हे अंतर लेखनामध्ये दिसत नाही; उलट एकसंध साहित्यकृती वाचनाचा आनंद या पुस्तकाद्वारे मिळतो.
तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विज्ञान या विषयातील विविध अभ्यासविषयक पुस्तकांमध्ये संयुक्त लेखन झाले आहे. मात्र, इंग्रजी भाषेतील प्रेमकथा हा प्रकार भारतामध्ये संयुक्तपणे लिहिला गेला आहे. ‘लिट्रेजर पब्लिशर्स’ ने ही इंग्रजी प्रेमकथा प्रकाशित केली आहे. ‘लेख’ आणि ‘लिपी’ ही या पुस्तकातील व्यक्तिचित्रे वाचकाला ‘जयपूर लिटररी फेस्टिव्हल’ फिरवून तर आणतातच; त्याचबरोबरीने आपल्या आवडत्या आणि नावडत्या लेखकांचादेखील खुमासदार शैलीत परिचय करून देतात. जयपूर लिटररी फेस्टदरम्यान घडणाऱ्या भेटींमधून या दोघांनाही स्वत:मधील प्रेमभावनेची जाणीव होते. भिन्न स्वभावप्रकृती असूनही ते एकमेकांमध्ये गुंततात आणि मग ‘लिटररी युवर्स’ या एका नव्या कथेची सुरूवात होते. पुस्तकातील ‘लेख’ या नायकाचे व्यक्तिचित्रण आणि लेखन चेतन जोशी यांनी, तर ‘लिपी’ या नायिकेचे व्यक्तिचित्रण आणि लेखन आशा फ्रान्सिस यांनी केले आहे. जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये घडणाऱ्या दोन लेखकांमधील या प्रेमकथेचे प्रकाशन फेस्टिव्हल संयोजकांच्या खास आग्रहास्तव या फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले.
बुकगंगा इंटरनॅशनल बुक सव्र्हिस येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोन वाचकांच्या हस्ते या प्रेमकथेचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने चेतन जोशी आणि आशा फ्रान्सिस या लेखकद्वयांनी वाचकांशी संवाद साधला. चेतन जोशी या मराठमोळ्या लेखकाचे हे तिसरे इंग्रजी पुस्तक असून त्यांच्या ‘ब्लाइंड मॅन्स बफ’ आणि ‘अॅनिमल पॅलेट’ या पुस्तकांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. ‘कॉकटेल कार्निव्हल’ हे त्यांचे आगामी पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. आशा फ्रान्सिस यांच्या यापूर्वी लघुकथा प्रकाशित झाल्या असून त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. जॉन हॉपक्रॉफ्ट यांचे चरित्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा