गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणजे देशाच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेतील नाव.. त्यांच्या राजकीय कारर्किदीवरील पुस्तकाचे प्रकाशन व पंतप्रधान पदासाठी ते योग्य आहेत की नाही, या विषयावरील परिसंवाद म्हटल्यावर विचार व्यक्त करणाऱ्यांबरोबरच ते ऐकणाऱ्यांमध्येही समर्थक व विरोधकांचा मोठा सहभाग अपेक्षितच होता.. गोध्रा दंगल, गुजरातचा विकास, मोदींचे व्यक्तिमत्त्व आदी विषयांवर विरोधी व समर्थनाची मते व्यक्त होत असताना एक विचारयुद्ध रंगले अन् उपस्थितांनीही प्रत्येकाच्या मताला दाद दिली..
मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीवरील ‘द नमो स्टोरी, अ पोलिटिकल लाइफ’ पुस्तकाचा पत्रकार सुनील माळी यांनी केलेला मराठी अनुवाद ‘कहाणी नमोची.. एका राजकीय प्रवासाची’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले. विश्वकर्मा पब्लिकेशन व अक्षरधाराच्या वतीने आयोजित प्रकाशन सोहळ्याला विश्वकर्मा इन्स्टिटय़ूटचे राजकुमार अगरवाल, भरत अगरवाल, ज्येष्ठ अभ्यासक आनंद हर्डीकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद खरे उपस्थित होते. परिसंवादात हर्डीकर, खरे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत व अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांनी सहभाग घेतला. माळी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
सावंत म्हणाले की, गोध्रा दंगलीची हाताळणी अतिशय चुकीची होती. त्याचा राजकीय फायदा घेतला गेला. गुजरातच्या विकासाबाबत केवळ भ्रम निर्माण केला जातो. दरडोही उत्पन्नात व उद्योगामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा पुढे आहे. गुजरातच्या मॉडेलमध्ये अनेक त्रुटी असल्याने ते देशासमोर मांडणे योग्य नाही.
हर्डीकर म्हणाले की, गोद्रा दंगलीचे बेजबाबदारपणे भांडवल करावे, असे जनतेलाच वाटत नाही. देशात एकाच दंगलीची चर्चा का होते?  काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींबाबत मौन का बाळगले जाते? पंतप्रधानपदासाठी मोदींच्या महत्त्वाकांक्षा व्यक्तिगत नाही, तर ती पक्षाची व जनतेची महत्त्वाकांक्षा आहे. खरे म्हणाले की, मोदी पंतप्रधानपदासाठी योग्यच असल्याचे जनतेला वाटते.