घुमान येथे होणारे नियोजित साहित्य संमेलन म्हणजे २१ व्या शतकातील तीर्थावलीकडे वाटचाल आहे, असे मत या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील ‘रंगत’ प्रकाशनतर्फे प्रकाश पायगुडे यांनी लिहिलेल्या ‘साहित्यवारी घुमानद्वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार चरणजित सप्रा यांच्या हस्ते झाले, त्या वेळी डॉ. मोरे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सरहद संस्थेचे संजय नहार, संतसिंग मोखा, नांदेड येथील नानकसाई फाउंडेशनचे पंढरीनाथ बोकारे, साहित्यिक डॉ. जगदीश कदम, प्रकाशक जयप्रकाश सुरनूर या वेळी उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि पंजाबातील संत आणि वीर पुरुषांच्या परंपरेमध्ये बरेच साम्य आढळून येते. महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये पंढरपूरच्या वारीला महत्त्व आहे. तेच महत्त्व आगामी काळात घुमानला प्राप्त झाले पाहिजे. नामदेव महाराजांनी केलेले कार्य हेच घुमान येथील आगामी साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे असे नाही, तर पूर्वीपासूनच महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये असलेले भाषिक ऋणानुबंध दृढ करण्याचे उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने दोन्ही राज्यांतील साहित्यप्रेमींच्या जाणिवा जागरुक होणार आहेत.’’
महाराष्ट्राच्या भूमीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे पंजाबला गुरु गोिवदसिंग यांचा इतिहास आहे. संत नामदेव यांनी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात घुमानला येऊन कार्य केले. त्याचप्रमाणे गुरु गोविंदसिंग यांनी नांदेड येथे जाऊन कार्य केले. दोन्ही संतांच्या दूरदृष्टीतून दोन राज्यांमध्ये नाते निर्माण होण्याची ही नांदी होती, असे चरणजित सप्रा यांनी सांगितले.
डॉ. माधवी वैद्य, प्रकाश पायगुडे आणि संजय नहार यांनी मनोगत व्यक्त केले. जगदीश कदम यांनी प्रास्ताविक केले. पंढरीनाथ बोकारे यांनी आभार मानले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा