प्रगतीच्या नावाखाली आपण निसर्गाला विसरलो आणि निसर्गाचे संरक्षण करावयाचे सोडून विध्वंस केला. वन आणि वन्य जीवांच्या जगण्यावरच माणसाचे जगणे अवलंबून आहे. हे ध्यानात घेऊनच निसर्गावर विजय मिळविण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षाही निसर्गावर आधारित जीवनव्यवस्था कायम ठेवणे आवश्यक आहे, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुणे वन्यजीव विभागातर्फे ‘मयुरेश्वर अभयारण्य’ आणि ‘भीमाशंकर अभयारण्य’ या विषयावरील चित्ररूप पुस्तिकेचे (कॉफी टेबल बुक) प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते झाले. उमा प्रभू, प्रधान मुख्य वनसंरक्षक मफिऊल हुसेन आणि मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये या वेळी उपस्थित होते.
निसर्गावर अवलंबून किंबहुना निसर्गाशी सुसंगत अशीच पूर्वी माणसाची जीवनशैली होती याकडे लक्ष वेधून प्रभू म्हणाले, प्रगतीच्या नावाखाली आपण निसर्गाचे नुकसान केले. निसर्गप्रेमी हा शब्दच जन्माला घातला नसता तर हे संकट आले नसते. जागतिक तापमानवाढ हा आपल्या जीवनपद्धतीचा परिपाक आहे. सर्वात उष्ण वर्ष म्हणून जगाच्या इतिहासात यंदाचे वर्ष गणले गेले आहे. निसर्ग संरक्षणाची चर्चा करण्यासाठी पॅरिसला भेटावे लागते. निसर्गाला मुठीत पकडू शकतो अशी कल्पना करण्यापेक्षाही निसर्गाशी सुसंगत जीवनपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. ३३ टक्के जमीन वनाखाली असणे हे आदर्श मानले जाते. पण, आपल्याकडे आज ही जमीन जेमतेम १९ टक्केदेखील नाही. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठीचे क्षेत्र कमी पडत आहे. प्रोजेक्ट टायगर प्रकल्पाला यश आले असून देशामध्ये वाघांची संख्या वाढत आहे. पाण्यामध्ये मासे असणे हे पाण्याची प्रत समजण्याचे लक्षण आहे. कोकणातील शाळांमध्ये ‘इको क्लब’ स्थापन करण्यात आले आहेत. समाज आणि सरकार यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या निसर्गप्रेमी संस्था स्थापन झाल्या पाहिजेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा