मराठी लेखक श्रीनिवास शारंगपाणी यांच्या ‘अवर डिस्टंट कझिन्स’ या इंग्रजीतील वैज्ञानिक कादंबरीचे नुकतेच जर्मनीमध्ये प्रकाशन झाले. त्यांच्या ‘मॅनिप्युलेशन’ या कादंबरीचे यापूर्वीच जगामधील अनेक देशांमध्ये वितरण झाले आहे. आता यानिमित्ताने भारतीय आणि पुण्यात वास्तव्यास असलेल्या मराठी लेखकाची पुन्हा एकदा जागतिक साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे.
गेली १५ वर्षे मी या कादंबरी लेखनाच्या प्रवासामध्ये आहे. या कालखंडात रशियाचे विघटन आणि जर्मनीचे एकत्रीकरण झाले. विज्ञानविषयक संकल्पना बदलत गेल्या. त्यानुसार या कादंबरीलेखनामध्ये बदल करावे लागले. मी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना जर्मनीतील प्रकाशनाने ‘आपले लेखन पाठवावे’, असे मला सुचविले. त्यानुसार ३० जानेवारी रोजी मी या कादंबरीची संहिता पाठविली आणि १६ फेब्रुवारी रोजी या कादंबरीचे प्रकाशन झाले, असे श्रीनिवास शारंगपाणी यांनी सांगितले. त्यांच्या ‘षडयंत्र’ या मराठी कादंबरीचा त्यांनीच ‘मॅनिप्युलेशन’ हा इंग्रजी अनुवाद केला आहे.
अश्विनी या भारतीय वीरांगनेसह सहा देशांमधील अंतराळवीर मंगळावर शोधमोहिमेसाठी जातात. तेथील गुहांमध्ये राहणाऱ्या लोकांशी संवाद साधत जुळवून घेत, कधी संघर्ष करीत त्यांना जाणून घेतात. माणसामाणसांतील नातेसंबंध, भावबंध, हेवेदावे, निसर्ग आणि उत्क्रांतीमधील टप्पे, पृथ्वीवरील लोकांची कट-कारस्थाने, राजकारण अशा बारकाव्यांनिशी ही कादंबरी लक्षवेधी ठरते. फँटसीसोबतच संभाव्य वैज्ञानिक शक्यतांची भाकिते वर्तविणे हे वैशिष्टय़ असल्याचे शारंगपाणी यांनी सांगितले.

Story img Loader