‘यांचं असं का होतं कळत नाही’.. ‘चिऊताई चिऊताई दार उघड’.. ‘जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला खिसा नसतो’.. आपल्या खास मिश्कील शैलीमध्ये या कविता सादर करणाऱ्या ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रतिभेला काव्यप्रेमी रसिकांनी ‘सलाम’ केला. ‘आपण ज्या टाळ्या वाजवल्या त्या मी भाषण करणार नाही यासाठी होत्या असे मी समजतो’, अशी प्रस्तावना करीत त्यांनी भाषणाऐवजी कविता सादर करून श्रोत्यांनाजिंकले.
कवी राजन लाखे यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘सौंदर्याच्या गर्भातून’ या कवितासंग्रहाचे आणि अनमोल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘मन माझे मी मनाचा’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या वेळी व्यासपीठावर होत्या.
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले,‘‘उत्तम गाणे लिहिता येणे ही परमेश्वराची देणगी असते. चांगली कविता हृदयाला साद घालत असते. चांगले गाणे सुरांचा शोध घेत असते. शब्द आणि संगीताची अर्थवत्ता यांचा सहजसुंदर मिलाफ काळजाचा ठाव घेते. उत्तम कविता आणि गीत केवळ साहित्यालाच नाही तर संस्कृती समृद्ध करते. जगण्याला अर्थ देत मानवी जीवन समृद्ध करण्याचे सामथ्र्य कवितेमध्ये असते.’’
मराठीमध्ये भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, सुधीर मोघे अशी गीतकाव्याची मोठी परंपरा आहे. या परंपरेचा भाग होण्यासाठीचा रियाज लाखे यांनी करावा, अशी अपेक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केली. लाखे यांनी मनोगत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र नांदुरकर यांनी आभार मानले.