वाङ्मयाचा इतिहास लिहिताना वाचकांच्या बदलत जाणाऱ्या अभिरुचीची दखल या इतिहासात आली पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पुण्यातील महिला पत्रकारांच्या ‘आयाम’ या संस्थेच्या माध्यमातून आणि आशय फिल्म क्लब, एनएफएआय आणि एफटीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात मानसी सप्रे लिखित ‘पुणे मर्डर क्रॉनिकल’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मोरे म्हणाले, एखाद्या शहराला मध्यवर्ती ठेवून लिहिलेली आणि त्यात पुणे शहराला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही पहिलीच कादंबरी असावी. शहर हेच या पुस्तकातील प्रमुख पात्र आहे. लेखिकेने अतिशय प्रासंगिक पद्धतीने या पुस्तकात पुणे शहराचे वास्तव मांडले आहे.
सप्रे म्हणाल्या, पुणे शहरात शिक्षण झाल्यामुळे पुणे शहराला जवळून अनुभवता आले. त्याचा प्रभाव या कादंबरीमध्ये पडणे स्वाभाविक आहे. पत्रकारिता आणि गुन्हेगारी या पाश्र्वभूमीवर पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
समीक्षक रेखा साने- इनामदार यांनी लेखिकेबद्दल मनोगत व्यक्त केले. मनस्विनी प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती जरांडे यांनी आभार मानले.
बदलत्या अभिरुचीची वाङ्मय इतिहासाने नोंद घ्यावी- डॉ. मोरे
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून मानसी सप्रे लिखित ‘पुणे मर्डर क्रॉनिकल’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले.

First published on: 09-03-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of pune murder cronical