कविता, गीत आणि लघुकथा यातून अभिव्यक्त होणारे.. एरवी अल्पाक्षरी बोलणारे आणि लेखन करणारे.. अशी प्रतिमा असलेले गुलजार शनिवारी भरभरून बोलत होते. संवादाच्या ‘अक्षरधारे’त रसिकांची सायंकाळ जणू ‘गुलजार’मय झाली. ‘मैं रिफॉर्मर नहीं, मेरे गीत रेकॉर्डर और रिमांईडर का काम करते है’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची शब्दफेक, भाषेचा लहेजा आणि बोलण्यातील तळमळ पाहताना ‘गुलजार बोलतात.. त्याची कविता होते’ याची प्रचिती काव्यप्रेमींना या मैफलीतून आली.
निमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित कार्यक्रमाचे. ऋतुरंग प्रकाशनतर्फे गुलजार यांच्या अंबरीश मिश्र यांनी अनुवादित केलेल्या ‘देवडी’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पाच वाचकांच्या हस्ते झाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक पी. एन. देशपांडे, प्रकाशक अरुण शेवते, अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर या प्रसंगी उपस्थित होते. यानिमित्ताने अंबरीश मिश्र यांनी गुलजार यांची मुलाखत घेतली.
एखादी घटना, जाणीव मग ती कथेतून व्यक्त करावी की कवितेतून, हे ठरविण्याचे निश्चित काही हिशेब नाहीत. अचंबित करणारी बाब कथेतून व्यक्त होते. ठरवून लेखन करणे मला जमत नाही. घुसळत घुसळत मला जे नेमके म्हणायचे ते नवनीत वर आले की मी लिहिण्यासाठी बसतो. कथेचा साचा आणि डोक्यामध्ये साठून राहण्यास वेळ लागतो. ती कथा कागदावर उतरवून काढण्यास वेळ नाही लागत. कवितेसाठी संवेदनशीलता उत्स्फूर्त असते. जसे संगीतासाठी सरगम शिकावी लागते तसे कवितेच्या आकृतिबंधामध्ये कलात्मक कुसर महत्त्वाची असते..गुलजार आपल्या निर्मितीची अवस्थाच सांगत होते.
कलाकाराचे जीवन हे त्याचे स्वत:चे कधीच नसते. तोही समाजाचाच एक भाग असतो. त्यामुळे तो कोणत्या तरी विचारधारेचा असतो. पण, विचारधारेचा असणे वेगळे आणि राजकीय पक्षाचा असणे यामध्ये भेद आहे. मला कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घ्यावासा वाटला नाही, असे सांगून गुलजार म्हणाले, प्रसूती वेदना भोगल्या नसल्या तरी मी मातृहृदयी आहे. आपण केवळ आपल्याच मुलांवर प्रेम करतो. प्राथमिक दृष्टिकोन निष्काळजीपणाचा झाला असून जबाबदारी स्वीकारण्याची तयारी नाही. त्यातूनच अत्याचाराच्या घटना घडतात. चित्रपटातून क्रांती होत नाही. त्यामध्ये समाजातील घटनांचेच प्रतििबब दिसते. मी तुमच्याच व्यथा, वेदना, आनंद कविता आणि गीतांतून मांडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कविता आणि गीत यात भेद करता का, असे विचारताच ‘माझ्यामागे चित्रपटांच्या गीतलेखनाचे वलय नसते तर तुम्ही इतक्या संख्येने मला ऐकण्यासाठी आला असता का’, असा प्रतिसवाल त्यांनी केला. मी चित्रपटाखेरीजचे जगदेखील पाहतो. चित्रपट गीतांचा दर्जा कमी की जास्त हे सांगता येणे अवघड आहे. कवितेमध्ये माझे विधान आणि बांधीलकी असते. अगदी ‘गोली मार भेजेमें’ सारखे गीत असले तरी त्यामागची भूमिका कवितेचीच असते. कविता लिहिणे माझ्या हाती असते. तर, चित्रपटगीत हे कथा, दृश्य, व्यक्तिरेखा आणि कधी संगीतावरदेखील लिहिले जाते. प्रयत्न, मेहनत आणि कुसर ध्यानात घेता गीतलेखन श्रेष्ठ आहे. पण, माझे विधान आणि बांधीलकी लक्षात घेतली तर कवितालेखन श्रेष्ठ आहे.
 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of third edition of devdi written by gulzar
Show comments