मराठी साहित्यामध्ये महत्त्वाची भर घालणाऱ्या ‘विदर्भ मराठवाडा बुक कंपनी’ या प्रकाशन संस्थेचे संस्थापक अच्युत जयवंत ऊर्फ अ. ज. प्रभू (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
प्रभू हे मूळचे गोव्याचे. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी सुरुवातीची काही वर्षे ‘व्हीनस प्रकाशन’ या संस्थेमध्ये काम केले. प्रकाशनाची पुस्तके विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये ते घेऊन जात असल्यामुळे त्यांची या प्रदेशांशी नाळ जुळली. पुढे स्वतंत्र प्रकाशन व्यवसायामध्ये पदार्पण करताना त्यांनी ‘विदर्भ मराठवाडा बुक कंपनी’ ही संस्था स्थापन केली. महादेवशास्त्री जोशी यांचे ‘तुपाचा नंदादीप’ हे त्यांनी प्रकाशित केलेले पहिलेच पुस्तक लोकप्रिय झाले. हे पुस्तक अनेक वर्षे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. रामायण, महाभारत, दत्तात्रेयकोश यांसारख्या धार्मिक पुस्तकांबरोबरच त्यांनी अभिनव मराठी शब्दकोशाची निर्मिती केली. प्रकाशन व्यवसायामध्ये अर्धशतकाहून अधिककाळ विदर्भ मराठवाडा बुक कंपनीने आपली नाममुद्रा उमटविली. मराठी प्रकाशक परिषदेच्या १९९६ मध्ये नागपूर येथे झालेल्या अधिवेशनाचे प्रभू यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा