मुंबई ही महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असली, तरी वाङ्मय निर्मिती आणि साहित्य प्रकाशनाच्या विश्वाचे पुणे हेच मुख्य ठाणे झाले आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यामध्ये प्रकाशकांची संख्या अधिक आहे. एवढेच नव्हे तर, ग्रंथ प्रकाशनाच्या संख्येमध्येही पुण्याने मुंबईवर मात केली आहे.
मराठी ग्रंथसूचीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या सहाव्या खंडाच्या माध्यमातून या माहितीवर प्रकाशझोत पडला आहे. या खंडामध्ये १९७९ ते १९८५ या कालखंडाचा विचार करण्यात आला आहे. या नोंदींना तीन दशके उलटली असली, तरी प्रकाशन विश्वामध्ये पुणे हेच आघाडीवर असून या परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचे या ग्रंथसूचीचे संपादक शरद केशव साठे यांनी सांगितले. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी ग्रंथसूचीचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पातील सहाव्या खंडाचे प्रकाशन पुण्यामध्ये झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाच्या सांगता कार्यक्रमात करण्यात आले.
या विषयी संपादक शरद केशव साठे म्हणाले, मराठी ग्रंथसूचीच्या सहाव्या खंडात १९७९ ते १९८५ या कालखंडात प्रकाशित झालेल्या साडेनऊ हजार पुस्तकांची विषयवार नोंद करण्यात आली आहे. यादीमध्ये प्रत्येक पुस्तकाची विषयापासून ते किमतीपर्यंतची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. या कालखंडामध्ये पुण्यामध्ये ५०० प्रकाशक आणि त्या सर्वानी मिळून ४२०० पुस्तके प्रकाशित केली आहे. तर, मुंबईतील ४०० प्रकाशकांनी अडीच हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत. सध्याच्या घडीला प्रकाशकांच्या संख्येत कदाचित फरक पडला असला, तरी प्रकाशनाच्या विश्वामध्ये पुणे हेच अग्रेसर राहिले आहे.
राज्यामध्ये वर्षभरात किती पुस्तके प्रकाशित होतात याची नोंद कोठेही होत नाही. त्यामुळे याविषयी नेमकेपणाने माहिती देता येणे अवघड असल्याचे मराठी प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अरुण जाखडे यांनी सांगितले. न्या. महादेव गोिवद रानडे यांनी पुण्यामध्ये ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना केली. त्यामुळे मराठी वाङ्मय व्यवहाराचे पुणे हेच पहिल्यापासून केंद्रस्थानी राहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बहुभाषक झाल्यामुळे तेथील ग्रंथव्यवहार पुण्याच्या तुलनेत कमी झाल्याचे प्रकर्षांने जाणवते.

Story img Loader