आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांची पुस्तके प्रकाशित करणारे ‘प्रेस्टिज प्रकाशन’चे आणि ‘प्रिंटेक्स’ या प्रिटिंग प्रेसचे संस्थापक सर्जेराव घोरपडे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. घोरपडे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
घोरपडे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. पदवी संपादन केली. ते कवठेमहांकाळ येथील सरंजामदार होते. मात्र, कुळ कायद्याचा फटका बसल्याने त्यांच्या जमिनी गेल्या आणि तेथून घोरपडे कुटुंबीय १९५२ मध्ये पुण्याला आले. सुरुवातीला काही काळ त्यांनी सुदर्शन मासिकामध्ये नोकरी केली. १९६५ मध्ये त्यांनी प्रेस्टिज प्रकाशन आणि प्रिंटेक्स हा प्रिटिंग व्यवसाय सुरू केला. सुबक निर्मितिमूल्य असलेल्या पुस्तकांच्या निर्मितीसाठी घोरपडे यांचा ध्यास होता. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध होता. त्यातूनच त्यांनी यशवंतरावांची ‘कृष्णाकाठ’, ‘भूमिका’ आणि ‘ऋणानुबंध’ ही तीन स्वतंत्र पुस्तके प्रकाशित केली. यशवंतरावांच्या निधनानंतर या पुस्तकांच्या रॉयल्टीचे हक्क यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे गेले असून या प्रतिष्ठानमार्फत यशवंतरावांचे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले जात आहे. ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांची पुस्तके त्यांनी मराठीमध्ये प्रकाशित केली होती. ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांची ‘अग्रलेख’, ‘वाचता वाचता’, ‘न्या. रानडे’ आणि ‘नेक ना. गोखले’ ही पुस्तके घोरपडे यांनी प्रकाशित केली होती. पाणी अडवा पाणी जिरवा या विषयावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे पुस्तक, बापू वाटवे यांचे ‘प्रभातनगरी’ यांसह ‘पुल पंचाहत्तरी’ आणि ‘आचार्य अत्रे’ असे गौरवांकही त्यांनी प्रकाशित केले होते.
प्रकाशक सर्जेराव घोरपडे यांचे वृद्धापकाळाने निधन
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची पुस्तके प्रकाशित करणारे ‘प्रेस्टिज प्रकाशन’चे आणि ‘प्रिंटेक्स’ प्रिटिंग प्रेसचे संस्थापक सर्जेराव घोरपडे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.
आणखी वाचा
First published on: 21-12-2013 at 02:46 IST
TOPICSप्रकाशक
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publisher sarjerao ghorpade no more