पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. अ‍ॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एन. मारे यांनी हा जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून आयएएस पूजा खेडकर होत्या. मात्र त्यांची काही दिवसांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली असून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तनप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरूनही वाद निर्माण झाला आहे. चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी चालू आहे.

हेही वाचा – विदर्भ, कोकणात दोन दिवस पावसाचा जोर कायम

हेही वाचा – देशात मक्याचा खडखडाट, प्रतिकिलो ३० रुपयांवर; कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम

या सर्व घडामोडींदरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाणप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बाणेर येथील मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी पुणे पोलिसांनी पिस्तूल रोखल्याप्रकरणी नोटीस देखील बजावला होती. त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ ते ६ पथके नेमली होती आणि त्यांच्यामार्फत शोध देखील सुरू होता. त्याच दरम्यान महाड येथील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर हे देखील आरोपी आहेत. अद्यापपर्यंत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याचदरम्यान अ‍ॅड. सुधीर शहा यांनी दिलीप खेडकर यांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावर न्यायालयाने काही अटी आणि शर्ती ठेवून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puja khedkar father dilip khedkar granted bail till july 25 svk 88 ssb