शिरुर : शिरुर शहरा जवळील दाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील १९ वर्षाचा युवक दिनांक ६ मार्चच्या रात्री घरातून बेपत्ता झाला असून त्याच गावात आज ( दिनांक १२ मार्च रोजी ) विहिरीत शिर नसलेला मृतदेह एका पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह बेपत्ता माउली गव्हाणे यांचा की अन्य कोण्याचा याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे वय -१९ हा दिनांक ६ मार्चला घरातून कोणाला काही न सांगता निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरुर येथील कॉलेजमध्ये तो दिसला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. माउली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
दरम्यान आज १२ मार्च रोजी सकाळी दाणेवाडीतील एका विहिरीत शीर नसलेला मृतदेह पोत्यात आढळून आला. हा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत शेकडो युवक शिरुर पोलीस स्टेशन येथे जमा झाले. दरम्यान सापडलेला मृतदेह बेपत्ता युवकाचा आहे की अन्य कोणाचा याबाबतीत डीएनए चाचणी करण्यात येत आहे. बेपत्ता युवकाचा शोधही घेण्यात येत आहे. डीनएनए अहवाल आल्यानंतर तपासाला आधिक गती येईल, असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी डीवायएसपी प्रशांत ढोले यांनी भेट देवून पाहणी केली.