पुणे : व्यायामशाळेत अल्पवयीनावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला खेड येथील विशेष न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी सुनावली.
याप्रकरणात शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे वय ३० वर्ष आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक अत्याचार) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली होती. १ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पीडित मुलगा व्यायामशाळेत गेला होता. तो व्यायाम करत होता. त्यावेळी आरोपीने त्याच्यावर व्यायामशाळेत अनैसर्गिक अत्याचार केले. आरोपीच्या तावडीतून मुलाने सुटका केली. घाबरलेल्या मुलाने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाय. वाय. पाटील यांनी याप्रकरणाचा तपास करुन आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
हेही वाचा – महाराष्ट्र वारकऱ्यांच्या विचाराने पुढे जात राहील- देवेंद्र फडणवीस
या खटल्यात विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. खटल्यात पीडित मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडित मुलगा अल्पवयीन आहे. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील विकास देशपांडे यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली.
हेही वाचा – पुणे : तुळशीबागेत महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी
आरोपीकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी, तसेच नुकसान भरपाईपोटी पीडित मुलाला देण्यात यावी, असे न्यायालायने निकालात नमूद केले आहे.