पुणे : जिल्हा सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या लिपिकाने साथीदारांशी संगनमत करून ४५ लाख ५४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी लिपिकासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा सुरक्षा मंडळातील सचिव अजय चोभे (रा. उत्सव होम, भोसरी) यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंत्राटी पद्धतीवर काम करणारा लिपिक अजय शिवाजी ठोंबरे (वय ३०, रा. स्नेहनगर, परळी वैजनाथ, बीड), केशव दत्तू राठोड, विकास चंदर आडे (वय ३३), पवन प्रेमदास पवार (वय २६), मोकाश रतन राठोड (वय २६, तिघे रा. वडगाव शेरी), मिथून शिवाजी राठोड (वय ३१, रा. दहिफळ, मंठा, जि. जालना), योगेश संभाजी मोडाले, लखन देवीदास परळीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुण्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आयटी इंजिनियरने शोधला सोपा पर्याय
जिल्हा सुरक्षा मंडळाचे कार्यालय सोमवार पेठेत आहे. आरोपी अजय ठोंबरे एका खासगी संस्थेकडून सुरक्षा मंडळात कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून काम करत होता. जिल्हा सुरक्षा मंडळाकडून सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांवर नियंत्रण ठेवले जाते. ठोंबरेने साथीदारांशी संगनमत केले. आरोपी राठोड, आडे, पवार, राठोड, मोडाले, परळीकर सुरक्षारक्षक असल्याचे भासविले. सुरक्षा मंडळाच्या बँक खात्यातील ४५ लाख ५४ हजार ९१७ रुपयांची रक्कम त्याने साथीदारांच्या खात्यात पाठवून फसवणूक केली. मंडळाच्या खात्यातील रक्कम आरोपींच्या खात्यात जमा झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. तेव्हा ठोंबरेने साथीदारांशी संगमनत करून फसवणूक केल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडाख तपास करत आहेत.