पुणे : महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एनआयईएलआयटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत एनआयईएलआयटीतर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना औरंगाबाद केंद्रावर एकूण ६८ अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात येणार असून, प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने राबवले जाणार आहेत.
बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. जयराज किदव यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. एनआयईएलआयटीचे सहसंचालक डॉ. लक्ष्मण कोर्रा, उपजिल्हाधिकारी आणि बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख अनिल कारंडे, कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे कौशल्य आणि संसाधने एकत्र करून अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे कौशल्यातील अंतर भरून काढण्यास उमेदवारांना सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा अॅनालिटिक्स , अँड्रॉइड ॲप डेव्हलपर, पायथन वापरून मशीन लर्निंग, वेब डेव्हलपर, सिस्टम आणि नेटवर्किंग स्पेशलिस्ट, मल्टीमीडिया डेव्हलपर, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एम्बेडेड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हे अभ्यासक्रम ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होतील.