उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक शहरांचे तापमान सरासरीच्या खाली आले आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान पुण्यात (७.८ सेल्सिअस) नोंदले गेले. थंडीच्या कडाक्याने पुणेकर चांगलेच गारठले आहेत. विदर्भातही थंडीची लाट आली आहे. येत्या चोवीस तासांत थंडी कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
गेल्या आठवडय़ात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट निर्माण झाली आहे. थंड वारे महाराष्ट्राकडे वाहत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमान झपाटय़ाने खाली येत आहे. त्यामुळे सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ, उत्तर कर्नाटकातही थंडीची लाट निर्माण झाल्याने अनेक शहरांचे तापामान सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांनी खाली गेले आहे. थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांपूर्वी पावसाळी वातावरणाचा अनुभव घेतलेले पुणेकर आता थंडीने गारठले आहेत. गेल्या दोन दिवसांत तापमान झपाटय़ाने खाली आले आहे. पुण्यात रविवारी राज्यातील आणि हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले. वाढलेल्या थंडीमुळे रविवार असूनही सायंकाळनंतर रस्त्यावर गर्दी कमी होती. अनेक ठिकाणी शेकोटय़ा पेटल्याचे चित्र दिसत होते. नागरिक गरम कपडे घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत. येत्या चोवीस तासांत शहरातील तापमान आठ अंश सेल्सिअस जवळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील रविवारचे किमान तापमान पुढीलप्रमाणे राहिले. जळगाव ११.३, कोल्हापूर १३.६, महाबळेश्वर ११, मालेगाव ११.३, नाशिक ९.७, सातारा ९.९, सोलापूर ११.४, मुंबई २१.४, सातांक्रुज १८, डहाणू १७.८, उस्मानाबाद ९, औरंगाबाद १०.५, परभणी ८.६, नांदेड १०, बीड ११.६, अकोला १०.५, अमरावती ९.४, बुलढाणा १२, चंद्रपूर १२.८, नागपूर ९.३, यवतमाळ ९.४ अंश सेल्सिअस.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा