पुणे : बंद पडलेल्या लिफ्टमधून मोकळ्या जागेत (डक्ट) उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर भागातील एका वसतिगृहाच्या विश्वस्तांसह रखवालदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अजय अशोक मिरांडे (वय १९, मूळ रा. वैष्णवी बंगला, सावेडी, अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे विश्वस्त, वसतिगृहाचे पर्यवेक्षक अंजना केतन मोतीवाला, रखवालदार सुभाष सुर्वे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध (भादंवि ३०४ अ), तसेच ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अजयचे वडील अशोक मदनलाल मिरांडे (वय ५५) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
हेही वाचा – लोणी काळभोर भागातील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदार तडीपार
हेही वाचा – पुणे : अबब!…पोलीस भरतीसाठी रस्सीखेच, पदे १२१९ अर्ज पावणेदोन लाख
शिवाजीनगर परिसरातील घोले रस्त्यावर जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे वसतिगृह आहे. १५ मार्च रोजी रात्री सव्वआठच्या सुमारास अजय आणि त्याचे मित्र लिफ्टमधून निघाले होते. त्यावेळी लिफ्ट बंद पडली. रखवालदार सुर्वे याने लिफ्ट बंद पडल्यानंतर मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले नाही. अजयला लिफ्टच्या डक्टमध्ये उडी मारण्यास सांगितले. अजयने उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. लिफ्टमधील मुलांना बाहेर काढण्यासाठी पर्यवेक्षक मोतीवाला यांनी योग्य त्या सूचना दिल्या नव्हत्या. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन वसतिगृहातील रखवालदारला दिले नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मोतीवाला यांच्यासह रखवालदार सुर्वे, तसेच विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बडे तपास करत आहेत.