पुणे : भरधाव बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील भरतकुंज सोसायटी परिसरात नुकतीच घडली. नियंत्रण सुटल्यानंतर बुलेटच्या धडकेत पादचारी ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि युवक जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यश कमलेश दहिवळ (वय १७, रा. दहिवळ बिल्डींग, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात पादचारी श्रीकांत दत्तात्रय दातार (वय ८६, रा. अलंकार सोसायटी, कर्वेनगर), जयराज राजेश हुलगे (वय १८, रा. आनंदविहार सोसायटी, सिंहगड रस्ता) जखमी झाले. याबाबत पोलीस हवालदार रामदास गोरे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश दहिवळ एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. एरंडवणे भागातून गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास तो महाविद्यालयातून बुलेटवरुन घरी निघाला होता. भरतकुंज सोसायटी परिसरात अप्पासाहेब कुलकर्णी पथ परिसरात त्याचे नियंत्रण सुटले. भरधाव बुलेट दुभाजकावर आदळली. यशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच पादचारी दातार, हुलगे यांना बुलेटने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यश, पादचारी दातार, हुलगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.

हेही वाचा – पुण्याहून हवाई प्रवास सुसाट…भोपाळपासून बँकॉकपर्यंत उड्डाण! पुणे विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक जाणून घ्या…

पालकच बेजबाबदार

शहरातील अनेक युवकांना पालक हौसेने वाहने चालविण्यात देतात. परवाना नसताना मुलांकडे दुचाकी, मोटारी अशी वाहने सोपविली जातात. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले होते. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेतले होते. पार्टी करुन तो मध्यरात्री मित्रांसोबत घरी निघाला होता. अगरवालने मुलाला परदेशी बनावटीची महागडी मोटार चालविण्यास दिली होती. मोटारचालकाशी वाद घालून अगरवालच्या मुलाने मोटारीचा ताबा घेतला होता. परवाना नसताना मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. पोलिसांच्या आदेशाकडे काणाडोळा करुन अनेक पालक परवाना नसताना अल्पवयीनांना वाहने चालविण्यास देतात. गल्ली बोळातून वाट काढत भरधाव वेगाने अल्पवयीन वाहन चालवितात. पोलिसांना चुकविण्यासाठी मुले आडवाटेने जातात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a college youth died after a bullet hit the divider pune print news rbk 25 ssb