पुणे : येरवडा भागातील एका काॅलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सहकाऱ्याने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला रात्री उशीरा अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपीने केलेल्या हल्ल्यात २८ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहायला आहे. ती येरवड्यातील एका प्रसिद्ध काॅलसेंटरमध्ये कामाल आहे. याप्रकरणी हल्लेखोर कृष्णा सत्यनारायण कनोज (वय ३०, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला येरवडा पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. तरुणीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, काय आहेत बदल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मूळची सातारची आहे. आरोपी कृष्णा आणि तरुणी काॅलसेंटरमध्ये कामाला आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारात तरुणी काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीवर कोयत्याने वार केले. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने तरुणीवर आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळाली. मात्र, हल्ल्यामागचे निश्चित कारण काय आहे, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा – शुश्रुषा करणाऱ्या महिलेकडून दागिन्यांची चोरी; महिला अटकेत; साडेआठ लाखांचे दागिने जप्त

काॅलसेंटरमधील तरुणीवर झालेला हल्ला आर्थिक वादातून झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे. आरोपीने कोयता लपवून आणला होता. त्याने कोयता कोणाकडून आणला, याची चौकशी सुरू आहे. तरुणीचा आरडाओरडा ऐकून सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसंच्या ताब्यात दिले. – मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

Story img Loader