पुण्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मी ही आत्महत्या करतो अशी चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झाला आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव सोनाली आनंदराव भिंगारदिवे असे आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी सोनाली मागील चार दिवसांपासून बेपत्ता होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि सोमेश घोडके यांच्यामध्ये गेल्या काही दिवासांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही मूळचे साताऱ्यामधील आहेत. नऱ्हेमधील झील कॉलेजच्या जवळ सोमेशने भाड्याने खोली घेतली होती. दोघेही एकत्र राहत होते. सोमेशला सोनालीचे इतर मुलाशी संबंध आसल्याचा संशय आला. चारित्र्याच्या संशयावरून सोमेशने सोनालीचा गळा आवळून खून केला.
चार दिवासांनंतर मृतदेह कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. सोनालीची हत्या तीन-चार दिवसांपूर्वी झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात अंदाज व्यक्त केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. सोमेश सध्या फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत.