पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीनाला भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज परिसरात ताब्यात घेतले. पिस्तूल बाळगणारा मुलगा कात्रज भागात राहणाऱ्या मित्राला भेटायला आला होता. याबाबत पोलीस कर्मचारी हनुमंत मासाळ यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कात्रज भागात पोलीस कर्मचारी चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारावकर आणि निलेश ढमढेरे १८ सप्टेंबर रोजी गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज स्मशानभूमी रस्त्यावर एक मुलगा थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याने कंबरेला पिस्तूल खोचल्याचे लक्षात आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या पथकाने पिस्तूल जप्त केले.
हेही वाचा – पुणे, पिंपरी चिंचवडसह उपनगराला जोरदार पावसाने झोडपले
मुलाची पोलिसांनी चौकशी केली. मुलगा नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात राहायला असून, त्याच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. तो वडिलांना व्यवसायात मदत करतो. मित्राला भेटण्यासाठी तो कात्रज भागात आल्याची माहिती चौकशीत मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समीर कदम, विश्वास भाबड, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, हवालदार नामदेव रेणुसे, शैलेंद्र साठे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सतीश मोरे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी ही कारवाई केली.