पुणे : काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागूल लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागूल यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
मी पक्षाचे काम केले, सर्व घटकातील नागरिकांशी जोडला गेलो आहे, मी प्रभागात काम केले आहे, तर माझ्यात कमी काय आहे, असा प्रश्न काँग्रेसचे आबा बागूल यांनी उपस्थित केला. निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर न्याययात्रेचा उपयोग काय? मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे, वयाची सत्तरी आली. आताच काँग्रेसमध्ये आलेल्या, आमदार असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा उमेदवारी का, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?
आबा बागूल म्हणाले, की निवडून येणारा उमेदवार पक्षाने दिला असल्याने आमच्या नाराजीने काय फरक पडते? राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहे. माझी पूर्ण तयारी आहे. मी नाना पटोले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटून लढण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेणार आहे. अन्य पक्षांच्या ऑफर असताना मी बाहेर पडलो नाही. मी पक्षाच्या विरोधात नाही. एक व्यक्ती एक पद हे तत्त्व कुठे गेले अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…
हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग
उमेदवारी देताना शहरातील ज्येष्ठांना विश्वासात घ्यायला हवे होते. अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे पक्षाला विरोध नाही. तेच तेच चेहरे किती वेळा देणार? गटातटाचे राजकारण बंद केले पाहिजे, मी कुणाचे जोडे उचलणार नाही, अशी ठाम भूमिका आबा बागूल यांनी मांडली.