Pune Accident : पुण्यातल्या वाघोली पोलीस स्टेशन समोरच्या फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या तीन मृतांमध्ये २२ वर्षांचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे. हे दोघं जण बहीण भाऊ आहेत. एक वर्षाच्या मुलीचं नाव वैभवी तर दोन वर्षांच्या मुलाचं नाव वैभव आहे. विशाल विनोद पवार असं २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवत असल्याचं तपासात समोर आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात कसा झाला याबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
आम्ही अमरावतीतून रात्रीच आलो होतो. १०.३० ते ११ च्या सुमारास आम्ही इथे आलो होतो. आम्ही सगळे फूटपाथवर झोपलो होतो. रात्री एक वाजण्याच्या सुमाराला डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
“अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खाडकन उठलो, समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेना. आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंतच सगळा खेळ खल्लास झाला होता, तिघजणं तर जागीच ठार झाले होते, रुग्णालयापर्यंतही पोहोचता आलं नाही. इतर जखमींना कसंबस रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचा जीव काही वाचू शकल नाही. ते एवढे जखमी झाले की रुग्णालयात पोहोचेपर्यंतच त्यांचा श्वास थांबला होता ” असे सांगताना त्या पित्याचे हृदय पिळवटून निघालं.
जखमी आणि मृतांची नावं काय?
रविवारी रात्री झालेल्या या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. विशाल विनोद पवार (वय २२ वर्ष), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय २ वर्ष) अशी तिघांची नावं आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८) आलिशा विनोद पवार (वय ४७) अशी सहा जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर आयनॉक्स हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याने मद्यपान केल्याचे तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील सर्वजण कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात कालच आले होते.