लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलावर दाखल गुन्हा अंगावर घेण्यासाठी मोटारचालकाला धमकाविल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र यांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मात्र, बावधन भागातील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी मोफा (महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क) कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात विशाल अगरवालला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक गंगाधर हेरिक्रुब याला अल्पवयीन मुलाचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी अगरवाल बाप-लेकांनी धमकावले होते. मोटारचालक गंगाधर यांना बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अगरवाल यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी मुक्तता करण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-पूर्व घाटात आढळला अनोखा बेडूक….काय आहे वेगळेपण?

आठवड्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, पुणे जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जाऊ नये, पारपत्र पोलिसांकडे जमा करावे, तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा अटी-शर्तींवर न्यायालयाने अगरवाल यांना जामीन मंजूर केला. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

महिनाभरानंतर सुरेंद्र अगरवाल कारागृहाबाहेर

मोटारचालकाला धमकाविल्याप्रकरणी सुरेंद्र आणि त्याचा मुलगा विशाल अगरवाल गेल्या महिनाभरापासून येरवडा कारागृहात आहेत. या गुन्ह्यात महिनाभरानंतर सुरेंद्र याला जामीन मिळाल्याने कारागृहाबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल अगरवाल येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. अद्याप त्याला या गुन्ह्यात जामीन मंजूर झालेला नाही.

आणखी वाचा-इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील २९ बंगल्यांवर हातोडा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणांचा पिंपरी महापालिकेला आदेश

विशाल अगरवालच्या अडचणींत वाढ

बावधन परिसरातील नॅन्सी ब्रह्मा को-ऑप हौसिंग सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी विशाल अगरवालसह साथीदारांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात नुकताच ‘मोफा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अगरवालला या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अगरवालला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी बाजू मांडली. २००७ मध्ये बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को-ऑप हौसिंग सोसायटीत ७१जणांनी सदनिका खरेदी केली. सोसायटीच्या मालकीची मोकळी जागा (ॲमेनिटी स्पेस, पार्किंग) आहे. मोकळ्या जागेच्या नकाशात फेरबदल मंजूर करण्यात आले. नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल तसेच साथीदारांनी सोसायटीच्या जागेत अकरा मजली इमारत बांधली, असा आरोप आहे.