पुणे अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त पोर्श या अलिशान गाडीची पाहणी करण्याकरता कंपनीचं शिष्टमंडळ पुण्यात आलं होतं. त्यांनी आज पोर्श गाडीची पाहणी आणि तपासणी केली असून त्यांना कोणताही तांत्रिक बिघाड गाडीत आढळला नाही. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ मे च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण अपघात झाला. मद्यधुंद अल्पवयीन चालकाने बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी एका दुचाकीवर चालवली. परिणामी या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण उजेडात येईपर्यंत पडद्याआड बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. हे प्रकरण दडपवण्यासाठी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा दावा केला जातोय. तसंच, अल्पवयीन मुलाच्या बेशिस्तीपणाचेही अनेक खुलासे समोर येत आहेत. तसंच, पोर्श या अलिशान गाडीच्या नोंदणीबाबतही महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या होत्या. म्हणून या गाडीच्या तपासणीसाठी पोर्श कंपनीचं शिष्टमंडळ आज पुण्यात आलं होतं.

अधिकाऱ्यांनी तपासाअंती काय सांगितलं?

पोर्श कंपनीने या गाडीची तपासणी केली असता त्यांना कोणताही दोष किंवा कोणतीही तांत्रिक समस्या जाणवली नाही. नुकतंच महाराष्ट्र वाहतूक विभागानेही या गाडीच्या नोंदणीबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार, या गाडीची केवळ तात्पुरती नोंदणी झाली आहे. कायमस्वरुपीची नोंदणी झालेली नाही. फक्त १७५८ रुपयांसाठी ही नोंदणी रखडलेली असल्याचंही महाराष्ट्र वाहतूक विभागाने स्पष्ट केलं होतं.

पोर्श गाडी बंगळुरू येथून खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे बंगळुरूतून पुण्यापर्यंत येण्यासाठी या गाडीची तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांसाठीच या गाडीची तात्पुरती नोंदणी झालेली आहे.

हेही वाचा >> कल्याणीनगर अपघात प्रकरण : रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे? या प्रकरणात आणखी काही जण सामील

दरम्यान, तात्पुरती नोंदणी झालेल्या या गाडीची आता पुढील १२ महिन्यांसाठी नोंदणी रद्द करण्यात आली आहे. कारण, या वाहनचालकाने मोटर वाहन कायद्या मोडला आहे. अल्पवयीन वाहनचालक अपघातादिवशी मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याला अपघाताची घटना आठवत नसल्याचं त्याने पोलिसांना जबाबात सांगितलं.

अल्पवयीन मुलाचे आई-वडिलांना अटक

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वडील विशाल आणि आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली. अगरवाल दाम्पत्याने कोणाच्या मध्यस्थीने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला, अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हाळनोरला कोणी सांगितले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त तांबे यांनी न्यायालयात दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune accident defect or technical failure in porsche car after the inspection the company officials gave important information sgk
Show comments