पुणे : वानवडी भागात दुचाकीस्वाराने पादचारी ज्येष्ठ महिलेला धडक दिली. तेथून निघालेले पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी हा प्रसंग पाहिला. त्यांनी त्वरीत ज्येष्ठ महिलेला मदत केली. खिशातील रुमाल काढून महिलेच्या जखमेवर बांधला. मात्र, तेवढ्यात दुचाकीस्वाराला अपस्माराचा (फिट) झटका आला. त्यांनी झटका आलेल्या तरुणाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठ महिलेसह दुचाकीस्वार तरुणाला त्वरीत वैद्यकीय मदत मिळाल्याने अनर्थ टळला.
वानवडीतील जगताप चौकातून पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे निघाले होते. एका दुचाकीस्वाराने पादचारी ज्येष्ठ महिलेला धडक दिल्याचे त्यांनी पाहिले. अपघातात ज्येष्ठ महिला जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शासकीय गाडी थांबविली. ज्येष्ठ महिलेच्या जखमेवर रुमाल बांधला. मात्र, तेवढ्यात दुचाकीस्वाराला अपस्माराचा झटका आला. त्यांनी त्वरीत तरुणाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्राथमिक उपचार करुन त्यांनी तरुणाला शुद्धीवर आणले. त्यांनी त्वरीत वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. ज्येष्ठ महिला आणि तरुणाला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्याची सूचना त्यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी : ई-रिक्षाधारकांना ३० हजार रुपये अनुदान; काय आहे महापालिकेचा उपक्रम?
हेही वाचा – पुणे : वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार, गोळीबारामागचे कारण अस्पष्ट
त्यानंतर त्यांना एका गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासाला जायचे असल्याने ते रवाना झाले. पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांच्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ महिलेसह तरुणाला त्वरीत वैद्यकीय मदत मिळाली. अपघातग्रस्तांना त्वरीत मदत केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. अपघातातील जखमींना मदत केल्यास पोलीस त्रास देतात, असा गैरसमज आहे. सामाजिक बांधिलकी जपून प्रत्येकाने अपघातग्रस्तांना मदत केल्यास त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे पोलीस उपायुक्त भाजीभाकरे यांनी नमूद केले.