पिंपरी : चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आज शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ हाेणार आहे. पिंपरी आणि भोसरीची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात, चिंचवडची थेरगाव येथे, तर मावळची तळेगाव दाभाडे येथील नूतन महाविद्यालय येथे होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चारही मतदार संघाचे अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. २,०२, ७६६ मतदारांनी ५१.७८ टक्के मतदान केले आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीद्वारे पिंपरीच्या मोजणीला सुरुवात होईल. २० फे-या हाेणार आहेत. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र तीन टेबल असणार आहेत. ११९ कर्मचारी येथे नियुक्त केले आहेत. दुपारी एकपर्यंत अंतिम निकाल हाती येईल.
हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील मतमोजणी कधी पूर्ण होणार ? प्रशासनाची तयारी काय ?
चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप, अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या मतदार संघात ३,८७,५२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. २९ टेबलवर मतमोजणीच्या एकूण २४ फे-या होणार आहेत. मतमोजणीसाठी १५० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भोसरीत भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यासह ११ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. ३,७४,४२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याठिकाणी २२ टेबलांवर मतमोजणी होणार असून २३ फे-या होतील. १४० कर्मचारी याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. टपाल मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत.मावळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके आणि सर्व पक्षीय अपक्ष बापू भेगडे यांच्यासह सहा उमेदवार नशीब आजमावत आहेत. या मतदार संघात २,८०,३१९ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. याठिकाणी १७ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून २९ फेऱ्या होणार आहेत. या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील अंतिम निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येईल असे निवडणूक प्रशासनाने सांगितले.