आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसंदर्भातील प्रकरणांमुळे कायमच चर्चेत असणारी सरकारी संस्था म्हणजे सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी. अनेकदा ईडी पाठवलेली नोटीस आणि टाकलेल्या धाडींवरुन बातम्या समोर येत असतात. राजकीय आऱोप प्रत्यारोपांमध्येही ईडीच्या नावाखाली टीका टीप्पणी केली जाते. मात्र सध्या ही ईडी चर्चेत आहे ती एका वकिलाने ईडीला पाठवलेल्या नोटीशीमुळे. पुण्यामधील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी इतरांना नोटीशी पाठवणाऱ्या ईडीलाच नोटीस पाठवली आहे. आश्चर्याची बाबमध्ये ईडीने कागदपत्रांच्या झेरॉक्सचे म्हणजेच फोटोकॉपींचे पैसे न दिल्याबद्दल सरोदे यांनी ही नोटीस पाठवली आहे. सक्तवसुली संचालनालयाने आपले एक हजार ४४० रुपये थकवले असून ते तातडीने परत करावे असं सरोदे यांनी या नोटीशीमध्ये म्हटलं आहे.
भाजपाचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादीमध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्यावर ज्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन आरोप केले जात आहेत त्यासंदर्भात ईडी मागील दीड ते दोन महिन्यांपासून चौकशी करत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडी ही चौकशी करत आहे. याच चौकशीचा भाग म्हणून ईडीने दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांचीही मदत घेतली होती. चौकशीसाठी कागदपत्र गोळा करताना ईडीने सरोदे यांच्या कार्यालयामधून शेकडो कागदपत्रांच्या झेरॉक्स घेतल्या. मात्र या झेरॉक्स देण्याआधी सरोदे यांनी सर्व प्रतींचा खर्च ईडीला द्यावा लागेल अशी अट घातली होती. खर्च उचलण्याची तयारी ईडीने दाखवली होती. मात्र त्यानंतर ईडीने हा खर्च सरोदे यांना दिलेला नाही. म्हणून आता सरोदे यांनी थेट ईडीलाच नोटीस पाठवली आहे. यासंदर्भातील बातमीचे वृत्त स्वत: सरोदे यांनी रिट्विट केलं आहे.
आपण झेरॉक्सच्या बिलाची प्रत ईडीच्या अधिकृत इमेल आयडीवर पाठवली होती असं सरोदे यांचं म्हणणं आहे. मात्र त्या गोष्टीला अनेक आठवडे होऊन गेल्यानंतरही पैसे किंवा काहीच उत्तर न आल्याने आता सरोदे यांनी थेट ईडीलाच नोटीस पाठवून पैसे परत करण्याची मागणी केलीय.