पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्यांच्या टाक्यांभोवती सीमाभिंत, सुरक्षारक्षकांसाठी केबिन तसेच आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. पुढील काही दिवसांत या कामाची निविदा काढली जाणार आहे. यामुळे सर्व पाण्याच्या टाक्यांवर सुरक्षारक्षक नेमता येणार आहेत. शहरातील २७ टाक्यांसाठी हा खर्च केला जाणार आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, धायरी, आंबेगाव परिसरात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण गेल्या दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात आढळले होते. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी दूषित असल्याने या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने या विहिरीवर लोखंडी जाळ्या टाकून विहिरीत कचरा जाऊ नये, याची काळजी घेतली.

वाढत असलेल्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम पुणे महापालिकेने होती घेतली आहे. पुणे महापालिकेच्या शहरात १५५ पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी निम्मा टाक्यांना सुरक्षारक्षक नाहीत. सुरक्षेसाठी सीमाभिंत नाही. त्यामुळे अनेकदा रात्री पाण्याच्या टाकीवर बसून मद्यपान केले जाते. पाण्याच्या टाकीभोवती मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडतात. यामुळे या टाक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील विविध भागांतील २७ पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन बांधण्याच्या निर्णय घेतला आहे. या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात रिकामी जागा असेल, तेथे वृक्षारोपण केले जाणार आहे. या सर्व कामांसाठी पुणे महापालिकेने पूर्वगणनपत्रक तयार केले आहे.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांभोवती सहा फुटांची सीमाभिंत, सुरक्षारक्षकांची केबिन तसेच या केबिनजवळ स्वच्छतागृहाची सुविधा तयार केली जाणार आहे. या कामासांठी ३५ कोटींची निविदा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने काढली जाणार आहे.

Story img Loader