पुणे : कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रावर गो पर्यटन केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्रात देशी गायींवर सर्वागीण संशोधन करून दुग्ध व्यावसायिक, शेतकऱ्यांसह शहरी लोकांना देशी गायींच्या देशातील विविध जातींची माहिती होईल. चाऱ्याच्या, औषधी वनस्पतींच्या विविध जाती, होमिओपॅथी उपचार, शेण, गोमूत्रापासूनची उत्पादने, दूध प्रक्रिया, सौरऊर्जा प्रकल्प, बायोगॅस प्रकल्पाचे प्रात्याक्षिक केंद्रात पाहता येईल.
गो पर्यटन केंद्राबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, गो पर्यटन केंद्रात देशी गायींच्या उत्कृष्ट वंशावळीच्या देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी गायींचे मुक्त संचार कळपाचे प्रात्यक्षिक अत्याधुनिक व स्थानिक पद्धतीने उभे करण्यात येणार आहे. अनुवांशिक सुधारणा करण्यासाठी या देशी गायींचे उच्च वंशावळीचे जातिवंत वळू खरेदी करण्यात येणार आहेत. राज्यातील खिल्लार, डांगी, लाल कंधारी, देवनी, गवळाऊ, कोकण कपिला या विविध जातींसह देशभरातील जातींचा तुलनात्मक अभ्यासही या केंद्रात करण्यात येणार आहे. साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी या देशी गायींच्या दूध उत्पादनाचा आणि प्रजनन कार्यक्षमतेचा अभ्यास केला जाणार आहे.
दर्जेदार दुग्ध उत्पादनास चालना
रसायन अंश मुक्त व सेंद्रिय दूध उत्पादन कसे करता येईल, शेतकऱ्यांसाठी पशूंचे प्रजनन, आहार, पशु आरोग्य आणि सेंद्रिय पशुपालन पद्धतींवर संशोधन करण्यात येणार आहे. माती, वनस्पती, मनुष्य आणि जनावरे यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शेण व गोमूत्र यांच्या वापराबाबतही अभ्यास केला जाणार आहे. वेगवेगळय़ा देशी गायींना लागणाऱ्या पोषण तत्त्वांच्या गरजा व पोषण मूल्यांनुसार आहाराचा अभ्यासही होणार आहे.
केंद्रात काय असेल?
* सुमारे १० हेक्टर जागेवर विविध जातींचा देशी गोवंश.
* मुरघास, गांडूळ खत, शेण, गोमूत्र प्रक्रिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती, कुक्कुटपालन केंद्र आदींची प्रात्यक्षिके.
* विविध चारापिके, औषधी वनस्पतींचा बगिचा आणि देशातील पहिलीच अकरा देशी गायींच्या जातींची गो परिक्रमा.
स्थानिक पातळीवर ऊर्जेची गरज भागविण्यासाठी किफायतशीर दरात आणि वापरास सुलभ असतील असे बायोगॅस सोलर पॉवर गोठा प्रकल्पाचे नवे तंत्र विकसित करण्यावर भर आहे. मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी गोमूत्राचा संभाव्य आणि उपचारात्मक वापर कसा करता येईल, याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासावर भर आहे. हे केवळ पर्यटन केंद्रच नाही तर गो-पालक, कृत्रिम रेतन करणाऱ्या तांत्रिक व्यक्तींची क्षमता वाढविणे, पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठीची सुसज्ज यंत्रणा उभारली जाणार आहे.
– डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी