पुणे : वाघोली परिसरातून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महामार्गावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होत आहे. पर्यायी मार्ग, सेवा रस्ते, बाह्यवळण रस्ते, उड्डाणपुलांची मागणी सामाजिक संघटनांकडून प्रशासनाकडे वारंवार करण्यात येत असली, तरी त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने हा परिसर आणि महामार्ग स्थानिकांसाठी दररोज प्रवास करताना जीवघेणा ठरत आहे.
वाघोली येथे झालेल्या डंपरच्या अपघातानंतर पुन्हा एकदा येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक व्यवस्थेतील अनागोंदी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा वाघोलीकरांचा आरोप आहे. ‘वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली होते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेच नियंत्रण नसल्याने तसेच रस्त्यांच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण, रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या खासगी प्रवासी बस, दुकाने, पथारीवाले यामुळेदेखील रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहतूक कोंडी, अपघात यामध्ये भर पडत आहे,’ असे स्थानिकांचे आणि सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : पुणे : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक
‘येत्या महिनाभरात या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. अन्यथा, मोठे आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा वाघोली अगेन्स्ट करप्शन संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार मिश्रा यांनी दिला.
नेमकी समस्या काय?
- वाढती लोकसंख्या आणि बांधकामे
- महामार्गाला पर्यायी रस्ता किंवा बाह्यवळण मार्ग नाही
- प्रमाणापेक्षा जास्त वाहनांचा प्रवास
- उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त
- अपघात झाल्याने वाहतूक कोंडी
हेही वाचा : पुणेकरांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास झाला सुखकर, काय आहेत नवीन बदल ?
वाघोली परिसरातून अहिल्यानगरच्या दिशेने जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. या मार्गाला सेवा रस्ते, बाह्यवळण मार्ग नसल्याने प्रमाणापेक्षा जास्त वाहनांचा या मार्गावरून प्रवास होतो. वाहतूक पोलिसांकडून, तसेच स्थानिक प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होत नसून तातडीने नियोजन करावे.
अनिल कुमार मिश्रा (अध्यक्ष, वाघोली अगेन्स्ट करप्शन संस्था)