पुणे : पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल आता सुरू झाले आहे. नवीन टर्मिनलवर उतरलेल्या प्रवाशाला तेथून बाहेर घेऊन जाणाऱ्या रिक्षा, टॅक्सीसारख्या व्यावसायिक प्रवासी वाहनांवर विमानतळ प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. अशा वाहनांकडून सुमारे ३०० ते ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांनी एरोमॉलमधून रिक्षा आणि टॅक्सी घेणे बंधनकारक आहे. खासगी वाहनाला मात्र प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून नेण्यास परवानगी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल १४ जुलैपासून कार्यान्वित झाले. नवीन टर्मिनलवरून रिक्षा अथवा टॅक्सी घेऊन बाहेर पडताना ३०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याचा मुद्दा अनेक प्रवाशांनी उपस्थित केला. रिक्षा अथवा टॅक्सी विमानतळाच्या आवारातच मिळाली तर प्रवाशांच्या सोयीचे ठरते. त्यासाठी एरोमॉलला जावे लागत नाही. नवीन टर्मिनलपासून एरोमॉलचे अंतर जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचा दंड रिक्षा आणि टॅक्सीला करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

हेही वाचा…दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या, सहा महिन्यांत १२६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवले

याबाबत पुणे विमानतळाचे संचालक प्रवीण ढोके म्हणाले की, नवीन टर्मिनलवरून सध्या १६ विमानांची ये-जा सुरू आहे. विमानतळाच्या आतमध्ये रिक्षा अथवा टॅक्सी या प्रवाशांना सोडू शकतात. मात्र, तेथून त्यांना प्रवासी घेण्यास मनाई आहे. आधीपासून हा नियम लागू आहे. आता नवीन टर्मिनलसाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. रिक्षा अथवा टॅक्सीने विमानतळावरून प्रवासी घेतल्यास तेथून बाहेर पडताना अशा वाहनांना ३०० ते ५०० रुपये दंड केला जात आहे. हा दंड प्रवाशाला नसून, वाहनचालकाला आहे.

प्रवाशांना एरोमॉलमधून रिक्षा अथवा टॅक्सी करता येते. या वाहनांना विमानतळाच्या आतमध्ये केवळ प्रवासी सोडता येतात. या वाहनांना आतमधून प्रवासी घेण्यास परवानगी दिल्यास या वाहनांची मोठी गर्दी विमानतळाच्या आवारात होऊन गोंधळ होतो. खासगी वाहनांना विमानतळाच्या आतमध्ये येऊन प्रवासी घेऊन बाहेर जाता येते. त्यांना यासाठी दंड आकारला जात नाही. केवळ व्यावसायिक प्रवासी वाहनांवर आधीपासूनच ही दंड आकारणी सुरू आहे, असेही ढोके यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…पुणे : येरवड्यात वैमनस्यातून सराइत गुन्हेगाराचा खून, तिघांना अटक

नवीन टर्मिनलपासून एरोमॉलला प्रवाशांना जाण्यासाठी दोन ई-बस उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर गोल्फ कार्टही उपलब्ध करून दिली आहेत. या दोन्ही सेवा प्रवाशांसाठी मोफत आहेत. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune airport fines rickshaws and taxis for picking up passengers at new terminal pune print news stj 05 psg
Show comments