पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सत्रातील (समर शेड्यूल) विमानांच्या उड्डाणांना रविवारपासून (३० मार्च) सुरुवात झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरून प्रतिदिवस १०४ ते १०९ हवाई उड्डाणे निश्चित करण्यात आली आहे, तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचे नियोजन आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये थंड ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल.

दरवर्षीप्रमाणे हवाई विभागाकडून उन्हाळी सत्राचे विशेष नियोजन करण्यात येते. शाळांच्या परीक्षांचा कालावधी संपल्यानंतर सुट्ट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाल पसंती दिली जाते. त्यातच हवाई उड्डाणांना विलंब किंवा इतर कारणांमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्या सर्व त्रुटी दूर करून सुलभ हवाई सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे विमानतळाच्या व्यवस्थापन विभागाने उन्हाळी सत्रांचे वेळापत्रक तयार केले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी सत्रातील वेळापत्रक सुरू झाल्याने हिवाळी सत्रातील वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. हिवाळी वेळापत्रकानुसार, पुणे विमानतळावर दररोज सुमारे ९० बाहेर जाणाऱ्या आणि ९० येणाऱ्या विमानांची उड्डाणे असून दिवसभरातून १८० विमानांची वाहतूक दिवसभरातून सुरू होती. याउलट, उन्हाळी संत्रात वाढ करून २०४ विमानांची वाहतूक होणार आहे. यामध्ये १०४ बाहेर जाणारी आणि १०४ बाहेरून पुणे विमानतळावर येणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश आहे.

नवीन सत्रातील वेळापत्रकामुळे ३५ आंतरराज्यीत आणि आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणे सुरु होणार आहे. यामध्ये दुबई, सिंगापूर, बँकॉक यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांचा समावेश आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातील आणि इतर भारतातील विविध राज्यातील थंड ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी नियोजन करणे सुलभ होणार आहे.

अशी आहेत उड्डाणे

पुणे विमानतळावरून हिवाळी सत्रानुसार विमानांची नियमित उड्डाणे होती, तीच उड्डाणे उन्हाळी सत्रात कायम असून नव्याने कुठलेही ठिकाण वाढविण्यात आलेले नाही. सध्या विमानतळावरून बँकाॅक, सिंगापूर आणि दुबई असे तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे, तर बंगळुरू, कोयंबतूर, रांची, लखनऊ, कोलकत्ता, दिल्ली, गोवा, इंदोर, नागपूर, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, भोपाळ, कोचीन, त्रिवेंद्रम, जयपूर, राजकोट, सूरत, देहरादून, हुबळी, रायपूर, भावनगर, अमृतसर आदी देशांतर्गत ठिकाणी विमानांची उड्डाणे होत आहेत.

पुणे विमानतळावरून ३० मार्चपासून हवाई उड्डाणांच्या उन्हाळी सत्राला सुरुवात झाली आहे. हिवाळी सत्रात हवाई उड्डाणांमध्ये निर्माण झालेल्या त्रुटी दूर करून उन्हाळी सत्रातील वेळापत्रकाचे नियोजन केले आहे. थंड हवेच्या ठिकाणी इच्छूक असणाऱ्या प्रवाशांनी या सत्रातील उड्डाणांचा लाभ घ्यावा.

संतोष ढोके, संचालक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे.

पुणे विमानतळ व्यवस्थापन विभागाने उन्हाळी सत्रातील हवाई उड्डाणांचे नियोजन केले आहे, ही बाबत चांगलीच आहे. मात्र, अनेकदा हवाई कंपन्यांकडून आसन शुल्क मनमानी प्रमाणे आकारले जाते, त्यावर नियंत्रण ठेवल्यास नक्कीच याचा फायदा होईल.

श्रीकांत हर्डीकर, प्रवासी